top of page

चातुर्मास 2024 संपूर्ण माहिती

यंदा महाराष्ट्रीय पंचांगानुसार आज १७ जुलै २०२४ पासून चातुर्मास सुरू होत आहे आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास म्हणतात. या काळात अनेक व्रतं-उपासना या करण्यात येतात. या काळातच ही विविध व्रते उपासना का करावीत, यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणेही आहेत. चातुर्मास्याचा काळ आरोग्याच्या दृष्टीनेही फार महत्त्वपूर्ण आहे.

या दिवसांमध्ये मुळा, वांगे, कांदा, लसूण खाण्यापासून व अतिप्रमाणात जेवणापासून दूर राहावे.


चातुर्मास 2024 संपूर्ण माहिती

चातुर्मासात कोणते कार्य करावे आणि कोणते करू नयेत.


  • शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पाचनतंत्र ठीक ठेवण्यासाठी पंचगव्य (गायीचे दुध, दही, तूप, गोमुत्र,दर्भजल) सेवन करावे.

  • पापांचा नाश आणि पुण्य प्राप्तीसाठी एक भुक्त (एकदाच जेवण), अयाचित (न मागितलेले) जेवण, चातुर्मास्य उपवास करण्याचे व्रत ग्रहण करावे.

  • देव, तुळसी,पूजनीय योग्यब्राह्मण यांना रोज विशिष्ट संख्या ठरवून चातुर्मास्यात लक्षप्रदक्षिणा व्रत.

  • शंकराला लक्ष बिल्वार्चन.

  • विष्णूला लक्ष तुलसीअर्चन.

  • गणेशाला लक्ष दूर्वार्चन.

  • सूर्याची पूजा व सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तापूर्वी अर्घ्य दान देवीला रोज कुंकुमार्चन.

  • श्रीकृष्णाला पारिजातकाच्या फुलांचे लक्षार्चन. असे विविध अर्चन प्रकार करता येतात.


रोज नैवेद्यासाठी विविध प्रकार.

  • नित्यअभिषेक.

  • तेलात तयार करण्यात आलेल्या भाज्यांचे सेवन करू नये असे काही ठिकाणी सांगितले आहे.

  • चातुर्मासात कोणतेही मंगलकार्य करू नये काही अडचणीच्या प्रसंगात कालसुसंगत शास्त्रानुसार विचार करुन कार्य करावे.

  • पलंगावर झोपू नये,

  • मत्स्य, मांस तसे कधीच खाऊ नये पण किमान चातुर्मासात तरी खाऊ नये

  • कांदा, मुळा, वांगे,लसूण हे पदार्थही खाऊ नयेत.


चातुर्मासात कोणकोणत्या गोष्टी कराव्यात.


आषाढ महिन्याच्या उत्तरार्धा आधिचे चारदिवस म्हणजे आषाढशुध्द एकादशी पासून चातुर्मासास प्रारंभ होतो. या एकादशी पासून एकादशी व्रत सुरु करावे. कायम एकादशी करणे अशक्य असल्यास किमान चातुर्मास्य एकादशी व्रत करावे. यानंतरच्या पुढील चार महिन्यांना चातुर्मास किंवा चातुर्य मास नावाने ओळखले जाते. चतुर लोकांचा महिना किंवा चातुर्य शिकण्यासाठीचा उत्तम काळ असा याचा शब्दश:अर्थ काहींच्या मते निघतो आणि याच कारणांमुळे या चार महिन्यांत भारतभर संत, महात्मे, ज्ञानी व्यक्ती एकांतवासात साधना करतात. काहीजण या चार महिन्यांमध्ये कडक उपवास करतात. काही जण जप-तप करतात, काही जण या चार महिन्यांमध्ये मनन, चिंतन, वाचन करत हे चार महिने सत्कारणी लावतात. या चार महिन्यांमध्ये आपल्या जीवनातील लपलेल्या रहस्यांचा चुकांचा स्वाध्याय करणे गरजेचे आहे. त्या चुका सुधारुन यातूनच आपल्याला यशस्वी आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग मिळेल.यंदा पंच मास आहे.

आषाढ शुक्ल एकादशी

हिला देवशयनी एकादशी सुध्दा म्हणतात या एकादशीला देव झोपतात ही श्रध्दा आहे. विठूमाऊलीच्या ओढीने लाखो वारकऱ्यांसह ज्ञानोबा तुकाराम आदि सकल संतांच्या पालख्यांचे आगमन पंढरीत होते आणि सुरु होतो चातुर्मास्य प्रवचन कीर्तन भजनाचा जागर.

गुरुपौर्णिमा

आपले सर्व धर्मकार्य सद्गुरुच्या सान्निध्यात, त्यांच्या चरणाशी लीन होऊन, त्यांच्याकडून विद्येची प्राप्ती करत करायची असते.

म्हणून सद्गुरुंची पूजा अर्चना करतात. या दिवशी गुरुदक्षिणा देणे शिष्याचे परमकर्तव्य आहे.


चातुर्मासातील पहिला महिना म्हणजे श्रावण. या संपूर्ण महिन्यात श्रवण, मनन, चिंतन, पठण यावर भर द्या. नियमांचे पालन करा.

श्रावण महिन्याच्या प्रत्येक वारानुसार सुध्दा उपासना आहे.

  • रविवार

आदित्य राणूबाईचे व्रत

सवितृसूर्यनारायणाचे पूजन श्रावणातील प्रत्येक रविवारी सूर्योदयाच्या समयी केले जाते.

  • सोमवार

भगवानशंकराच्या पूजनाचे महत्त्व आहे .

  • मंगळवार

विवाहानंतर श्रावणातल्या पहिल्या मंगळवारापासून पुढील पाचवर्षे श्रावणात प्रत्येक मंगळवारी शिवमंगलागौरीचे पूजन प्रत्येक नवविवाहितेने केले पाहिजे.

  • बुधवार/ गुरुवार

बुध-ब्रहस्पतीचे पूजन

द्वार, धन-धान्यभंडार, या ठिकाणी चंदनाने बाहुल्या काढून करावे.

  • शुक्रवार

षष्ठिदेवी-जराजीवंतिका पूजन गूळ-फुटाणे दूध याचा नैवेद्य अर्पण करुन केले जाते.

  • शनिवार

अश्वत्थनारायण, भगवाननृसिंह, श्री हनुमान यांचे पूजन करावे . या दिवशी बटूभोजनाचे महत्त्व सांगितले आहे.


नागपंचमी

नवनागांचे पूजन पूर्वी नागाच्या वारुळा जवळ करीत .

मात्र असे न करता घरीच नागांचे चित्र काढून त्याचीच पूजा करावी .


कुलाचार

आपल्या कुलदेवतेची आरधना पूजा,नैवेद्यासाठी पुरणपोळी इ.त्यात्या कुलातील रितीरिवाजानुसार शुद्धअष्टमी , शुद्धचतुर्दशी, किंवा पौर्णिमा या दिवशी करतात. खानदेश विदर्भ या भागात नागपंचमी नंतरच्या रविवारी किंवा कुलाचाराप्रमाणे शुक्ल पक्षातील रविवारी रोट या नावाने "रण्णा-सण्णा" देवी यांची विशिष्ट पध्दतीने पूजा व नैवेद्य करतात. यात परंपरागत आलेल्या एका श्रीफळाची देवीचीमूर्ती म्हणून पूजा करतात.


श्रावणी

आपापल्या वेदशाखे प्रमाणे नागपंचमी किंवा पौर्णिमा या दिवशी वेदोच्चारण करतांना जे दोष निर्माण होतात ते दोष विसर्जन करुन पुन्हा नव्याने वेदारंभ करावा याला उपाकर्म, श्रवणकर्म म्हणतात. या वेळी अरुंधती याज्ञवल्क्य सहित सप्तर्षींची पूजा करुन, जानवे बदलले जाते.


रक्षाबंधन-नारळीपौर्णिमा

ही येते. या दिवशी सद्गुरूंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी. या महिन्यात ते तुम्हाला तुमच्या योग्यतेची जाणीव करून देतील.

तुम्हाला पुढील आयुष्यात कोणता मार्ग निवडायचा आहे? कोणत्या गोष्टी प्रकर्षाने टाळायच्या याविषयीचे ज्ञान तुम्हाला तुमचे गुरु करुन देतात. तुलसीदास यांनी म्हटले आहे, एहि कलिकाल न साधनदूजा | योग, यज्ञ, जप, तप, व्रत पूजा’* तुमची योग्यता तपासल्यावरच तुम्ही जप, तप, यज्ञ करण्यास योग्य आहात का याविषयी तुमचे गुरूजी तुम्हाला मार्गदर्शन करतील. श्रावण महिन्याच्या कृष्णपक्षात श्रीकृष्णजन्माष्टमी येते. भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव अत्यंत भक्तीरसपूर्ण साजरा करण्याची आपली परंपरा आहे.


गोपाळकाला

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला अर्थात दहिहंडी संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या धामधूमीत संपन्न होतो.

'कृ’ धातू क्रियाशीलता स्पष्ट करणारा आहे.म्हणून या महिन्यात साधकाने आपली क्रियाशीलता वाढवत स्वत:ला सिद्ध करावे.श्रीमद्भगवतगीतेचे वाचन आणि श्रवण मनन याच महिन्यात केले जाते.


चातुर्मास 2024 संपूर्ण माहिती

भाद्रपदातील श्रेष्ठ कर्म -

श्रावणातील तुमचे कार्य निर्विघ्न पार पडले की पुढचा महिना येतो भाद्रपद. भाद्रपद (‘भद्र’ म्हणजे श्रेष्ठ आणि ‘पद’ म्हणजे पुढील वाटचाल) याचाच अर्थ या महिन्यात तुम्हाला श्रेष्ठ कार्य करायचे आहे.


शुक्ल पक्षात हरतालिका - हे व्रत, माता पार्वतीने आपल्या सख्यांसह करुन अत्यंत कठीण व्रत कठोरपणे आचरण केले. आणि तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून कुमारिका सुवासिनी या व्रताचे आजही परिपालन करतात.


श्री गणेशचतुर्थी - पार्थिवगणेश पूजन माता पार्वतीने आपल्या मलापासून निर्माण केलेल्या श्रीगणेशाचे पूजन, पृथ्वीपासून अर्थातच मातीपासून निर्माण केलेल्या श्री गणेशाचेपूजन . पार्थिव अर्थात माती पासून निर्माण केलेल्या मूर्तीची पूजा श्रावणात पार्थिव शिवलिंगार्चन

भाद्रपदात पार्थिवगणेश पूजन अश्विनात प्रत्यक्ष भूमीत नवधान्य पेरून आदिमायेची पूजा . तसेच सप्तशतीच्या तेराव्या अध्यायात सुरथराजाने मातीपासूनच मूर्ती करुन पूजा केल्याचे वर्णन केले आहे.कृत्वा मूर्तिं महीमयीम् तेव्हा या तीनही देवता पृथ्वीचे,भूमीचे महत्त्व वाढवणाऱ्या आहेत. आणि या तीनच देवतांचे पार्थिवमूर्ती स्वरुपात पूजन केले जाते. पार्थिव गणेश पूजनातच नव्हे तर श्रीगणेश पूजनातच दूर्वा महत्त्वाच्या मानल्या जातात. त्या, त्यांच्यातील औषधी गुणांमुळे दीर्घायुष्य प्राप्त करण्याचा मंत्र देतात. हा पार्थिव गणेशोत्सव आता जगभरात साजरा होत असतो.


ऋषीपंचमी - या विरक्ती व भक्ती प्रदान करणाऱ्या या व्रतात सप्तर्षींसहअरुंधतीचे पूजन ज्येष्ठमाता करतात .


ज्येष्ठागौरी/महालक्ष्मी - अनुराधा नक्षत्रावर आवाहन ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन .असे तीन दिवसांचे हे व्रत आहे. मोठ्या प्रमाणात सण म्हणून साजरा करतात. दक्षिण महाराष्ट्रात गौरी (पार्वती) स्वरुपात . मराठवाडा,विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, या भागात ज्येष्ठा(अलक्ष्मी) कनिष्ठा(लक्ष्मी) या स्वरुपात पूजन केले जाते.


अनंत चतुर्दशी - भगवान श्रीकृष्णांची अनंत स्वरुपात पूजा केली जाते. दानाचे महत्त्व सांगणारे हे व्रत आहे.

याच महिन्यात सर्वश्रेष्ठ ग्रंथराज श्रीमत् भागवत सप्ताह याला प्रौष्ठपदी म्हणतात अनन्यसाधारण महत्व असलेला काल आहे.

याची समाप्ती पौर्णिमेला होत असते.


पितृपक्ष - या महिन्याचा वद्य पक्ष पितृपक्ष म्हणून ओळखला जाते. समस्त पूर्वजांना पिंडप्रदान तर होतेच पण ज्यांचा आपला काहीही संबंध नाही त्यांना सुध्दा धर्मपिंड याच काळात देता येतो. आपली श्रद्धा कायम राखत आपल्या पूर्वजांच्या गुणांचे अनुकरण करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा काळ आहे.


अश्विन महिना निरोगी जीवनाचे सार -

चातुर्मासातील तिसरा महिना अश्विन - यात येते नवरात्र वर निर्देशित केल्याप्रमाणे त्रैलोक्य जननी माता भगवतीची नवधान्य पेरुन पूजा बांधली जाते. काहींच्या कुलाचारांनुसार पापड्या, कडकण्या, सांजोऱ्या यांचा फुलोरा देवीच्या डोक्यावर बांधला जातो. रोज किंवा पंचमी,अष्टमी या दिवशी सप्तशतीपाठ, अष्टमी किंवा नवमीला पाठाचे हवन करुन नवमी किंवा दशमीला नवरात्रोत्थापन हे ज्याच्या त्याच्या कुलपरंपरेने करतात.


ललितापंचमी - नवरात्रातील पंचमीला *उपांगललिताव्रत* अत्यंत भक्तीभावाने आणि कुलपरंपरेनुसार केले जाते. संयम अणि नियम पाळण्याचा हा कालावधी आहे. या कालावधित मातृशक्तीप्रती आदर व्यक्त केला जातो. जर आपण याचे तंतोतंत पालन केले तर विवेक शक्ती, ज्ञान-शक्ती आणि पराशक्ती जागृत होते. हाच खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी करण्याचा क्षण आहे. या दसऱ्याच्या दिवशी शमी व अश्मंतक(आपटा)यांची पूजा करुन सिमोल्लंघन करतात. नंतर आपट्याची पाने एकमेकांना देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा देतात.यात आपल्या आसुरी विचारांवर विजय प्राप्त करत प्रभू रामचंद्रांप्रमाणे मर्यादेचे पालन करु शकू हा निर्धार आहे.


कोजागरी पौर्णिमा - या पौर्णिमेला चंद्राकडून अमृत स्त्रवले जाते म्हणून मध्यरात्री इंद्र आणि चंद्र यांचे पूजन करुन आटिव दूधाचा नैवेद्य समर्पित करतात. व रात्री नाना प्रकारचे खेळ, नृत्य द्यूतक्रीडा, करुन जागरण केले जाते. या महिन्यात पौर्णिमेला अश्विनी नक्षत्र असते. याची देवता अश्विनीकुमार आहे. त्यांनी महर्षी च्यवन यांना महान औषधांचा उपदेश करत त्यांना चिरायू आणि कायम तारुण्य प्रदान केले. महर्षी च्यवन यांच्याप्रमाणेच चिरायू आणि तारुण्य मिळवायचे असेल तर या महिन्यात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत निरोगी आरोग्य जगण्याचा प्रयत्न करावा.


गुरुद्वादशी - दत्तप्रभूंनी या दिवशी श्रीनृसिंहसरस्वती स्वरुपात मोठी लीला केली. आजही नृसिंहवाडी, गाणगापूर, किंवा प्रत्येक श्रीदत्त देवस्थानी हा उत्सव संपन्न होतो. समुद्र मंथनादरम्यान याच महिन्यात धन्वंतरीअमृत घेऊन अनेकानेक रत्न आणि लक्ष्मी प्रगट झाली होती


धनत्रयोदशी - देवांचे वैद्य ,आयुर्वेदाचे उद्गाते भगवानधन्वंतरींचा अवतार दिन. सर्वत्र उत्साहात संपन्न होतो. याच दिवशी सायंकाळी आपल्या धनसंपदेची पूजा करुन. अक्षयधनाची कामना करावी.


नरक चतुर्दशी - नरकासुराचा संहार करुन त्याने बंदी बनवलेल्या एकहजार राजकन्यांची मुक्तता करुन त्या राजकन्यां बरोबर स्वतः विवाह करुन समाजात सन्मानाने जगता येईल अशी व्यवस्था केली. तोच हा नरकचतुर्दशीचा दिवस अभ्यंगस्नान करुन दीपावलीचा पहिला दिवस मानला आहे.


लक्ष्मीपूजन - येणा-या पिकांचे संवर्धन करण्याची तयारी कृषिराजा याच महिन्यात करत असतो. .

नवीन पीक आणि लक्ष्मीचे पूजन करत याच महिन्यात करतात. याच दिवशी सायंकाळी चित्र-लेखनी-सहित-लक्ष्मी- कुबेराचे पूजन करतात. व्यापारी आपल्या वह्या(चित्र) (लेखनी)पेन,लक्ष्मी, (कुबेर)तिजोरी, याची पूजा करुन आनंद साजरा करतात. मध्यरात्री कचरा काढून बाहेर टाकतात याला अलक्ष्मी निःसारण असे शास्त्रात म्हटले आहे. इतर दिवशी मात्र मध्यरात्री कचरा काढणे अशुभ मानले आहे.


क्रियाशील कार्तिक महिना

चार्तुमासातील चौथा आणि अखेरचा महिना म्हणजे कार्तिक.


बलीप्रतिपदा - भक्त प्रल्हादाचा नातू बली याच्या कडे भगवंतांनी तीनपाऊले भूमी मागितली दोन पावलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापल्यानंतर तिसरे पाऊल बलीने स्वतःच्या डोक्यावर ठेवायला सांगितले. या दिवशी पतीला आणि मोठ्या वडीलधाऱ्यांना स्त्रिया आणि भाऊ सोडून सर्व मोठ्यांना कुमारिका औक्षण करतात .त्यांना ओवाळणी मात्र दिलीच पाहिजे हं.


भाऊबीज - बहिणभावाच्या प्रेमाचा हा दिवस. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हणतात. प्रत्यक्ष यमराज बहिणीकडे जातात म्हणून त्या दिवशी मृत्यू सुद्धा होत नाही अशी श्रद्धा आहे. बहिणीने भावाला ओवाळून झाल्यावर भावाने हक्काने ओवाळणी दिलीच पाहिजे असा हा दीपावलीचाआनंद लुटला जातो.


कार्तिकी एकादशी - चातुर्मास्याचा काळ संपलेला. ग्रीष्मा ऋतूचे ऊन वर्षा ऋतूतील पाऊस संपून शरदाचं चांदणं अनुभवताना वारकऱ्यांना आपल्या काळ्या आईच्या पोटी आलेल्या धान्यलक्ष्मीची ओढ लागते विठूमाऊली आणि काळीआई मनातली घालमेल हळूहळू दूर होते. एकादशीचा उपवास आणि महाद्वार काला करुन जड पावलाने वारकरी घरी परततो.घरी येतो पण पंढरीची आठवण जात नाही. मग अंगणातल्या तुळशीचा आणि दामोदर स्वरुपातील भगवान श्रीकृष्णाचा विवाह सोहळा संपन्न करुन नित्याच्या कामाला सगळ्यांची सुरुवात होते.

६ views० comments

Comments


SUBSCRIBE FOR EMAILS
© Copyright
  • Facebook
  • Instagram

© 2035 Powered & Secured by ISPDHAAM.

Terms & conditions

Privacy policy

Accessibility statement

bottom of page