top of page

परान्न का घेऊ नये?

बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करत असे. त्याच्यातून एकदिवस त्याची स्टेशन मास्तरांशी ओळख झाली. पुढे त्याचे गाढ मैत्रीत रूपांतर झाले. स्टेशन मास्तरांशी मैत्रीमुळे त्याला बोगीतून चोरून काढलेला सुवासिक तांदूळ अगदी स्वस्तात चांगला मिळू लागला. असं खूप दिवस चाललं. व्यापाऱ्याने विचार केला की इतकं पाप होतंय तर थोडा दानधर्म पण व्हायला हवा. एकदिवस त्याने बासमती तांदुळाची खीर बनवली. आणि एका साधूला आमंत्रित केले. त्यानुसार साधु महाराजांनी व्यापाऱ्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करून त्यांच्या घरी गेले. पाहुणचार घेतला. भोजन केले. खिरीचा आस्वाद घेतला. दुपारची वेळ होती. व्यापारी म्हणाला "महाराज थोडावेळ आराम करा. ऊन कमी झाले की जा"


साधु महाराजांनी ते ऐकलं. ते आराम करत असलेल्या बेडमध्ये लपवून व्यापाऱ्याने खूप मोठ्या रकमेच्या नोटांची बंडल ठेवली होती. साधुमहाराजांनी त्या बेडवर आराम केला. त्यांना नोटांची चाहूल लागली. इतक्या बंडलां पैकी दोन चार बंडल झोळीत घातली तर काय फरक पडणार आहे? व्यापाऱ्याला तरी समजणार देखील नाही. असा विचार करून त्यांनी तीन चार बंडल झोळीत घातली. संध्याकाळी व्यापाऱ्याला आशीर्वाद देऊन साधुमहाराज निघून गेले. दुसऱ्या दिवशी व्यापारी नोटा मोजायला बसल्यावर त्याच्या लक्षात आलं की पैसे कमी आहेत.



व्यापारी विचार करू लागला की, महाराज कसे चोरी करतील? व्यापाऱ्याने नोकरांची पिटाई चालू केली. इतक्यात साधू महाराज तिथे पोहोचले. आपल्या झोळीतून नोटांची बंडल काढून व्यापाऱ्याला देत म्हणाले, "नोकरांना मारू नका. मी पैसे घेऊन गेलो होतो."

व्यापारी म्हणाला, महाराज तुम्ही कसे पैसे चोराल? इथे नोकरांकडे चौकशी सुरू केल्यानंतर भीतीने त्यांच्यापैकी कुणीतरी तुम्हाला ते पैसे दिले असतील, आणि नोकराला वाचवण्यासाठी तुम्ही असं बोलत असाल."

साधुमहाराज म्हणाले "हा दयाळूपणा नाही. खरंच मी मोहापायी पैसे चोरले होते."

साधुमहाराज म्हणाले "शेठ तुम्ही खरं सांगा, काल तुम्ही खीर का आणि कशाची बनवली होती?"


व्यापाऱ्याने खरी खरी सर्व हकीकत त्यांना सांगितली. साधुमहाराज म्हणाले "चोरीच्या तांदळाची खीर खाल्यामुळे माझ्या मनात पण चोरीची भावना निर्माण झाली. सकाळी जेंव्हा पोट मोकळे झाले, तेंव्हा माझी बुद्धी पुन्हा जागेवर आली आणि माझ्याकडून किती मोठी चूक झाली त्याची जाणीव झाली. " माझ्यामुळे बिच्याऱ्या नोकरांना त्रास झाला असेल, म्हणून मी तुमचे पैसे परत करायला आलो" म्हणूनच

जसं खाऊ अन्न तसं होईल मन, जसं पिऊ पाणी, तशी होईल वाणी.

जशी शुद्धी तशी बुद्धी, जसे विचार, तसा संसार.


  • - गुरू रेवती (माई)

१४ views० comments

Comments


SUBSCRIBE FOR EMAILS
© Copyright
  • Facebook
  • Instagram

© 2035 Powered & Secured by ISPDHAAM.

Terms & conditions

Privacy policy

Accessibility statement

bottom of page