शिवस्तुती मराठी | Shiv Stuti Lyrics Marathi
शिवस्तुती | Shiv Stuti Lyrics Marathi
कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १॥
रवींदु दावानल पूर्ण भाळीं । स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २॥
जटा विभूती उटि चंदनाची । कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्वनिवांतकारी। तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३॥
वैराग्ययोगी शिव शूलपाणी । सदा समाधी निजबोधवाणी ।
उमानिवासा त्रिपुरांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ४॥
उदार मेरू पति शैलजेचा । श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधी जो गजचर्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ५॥
ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरि सोमकांत ।
गंगा शिरीं दोश्ह महाविदारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ६॥
कर्पूरगौरीं गिरिजा विराजे । हळाहळे कंठ निळाचि साजे ।
दारिद्र्यदुःखेंस्मरणें निवारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ७॥
स्मशानक्रीडा करितां सुखावे । तो देवचूडामणि कोण आहे ।
उदासमूर्तीं जटाभस्मधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ८॥
भूतादिनाथ अरिअंतकाचा । तो स्वामि माझा ध्वज शांभवाचा ।
राजा महेश बहुबाहुधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ९॥
नंदी हराचा हर नंदिकेश । श्री विश्वनाथ म्हणती सुरेश ।
सदाशिव व्यापक तापहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १०॥
भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदें करि काम भग्न ।
तो रुद्र विश्वंभर दक्श मारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ११॥
इच्छा हराची जग हें विशाळ । पाळी रचीतो करि ब्रह्मगोळ ।
उमापती भैरव विघ्नहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १२॥
भागीरथीतीर सदा पवित्र । जेथें असे तारक ब्रह्ममंत्र ।
विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १३॥
प्रयाग वेणी सकळा हराच्या । पादारविंदीं वहाती हरीच्या ।
मंदाकिनी मंगल मोक्षकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १४॥
कीर्ती हराची स्तुति बोलवेना । कैवल्यदाता मनुजां कळेना ।
एकाग्रनाथ विश्ह अंगिकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १५॥
सर्वांतरीं व्यापक जो नियंता । तो प्राणलिंगाजवळी महंता ।
अंकीं उमा ते गिरिरूपधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १६॥
सदा तपस्वी असे कामधेनू । सदा सतेज शशि कोटिभानू ।
गौरीपती जो सदा भस्मधारी । तुजवीणशंभो मज कोण तारी ॥ १७॥
कर्पूरगौर स्मरल्या विसांवा । चिंता हरी जो भजकां सदैवा ।
अंतीं स्वहीत सुचना विचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १८॥
विराम काळीं विकळ शरीर । उदास चित्तीं न धरीच धीर ।
चिंतामणी चिंतनें चित्तहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ १९॥
सुखावसाने सकळें सुखाचीं । दुःखावसाने टळती जगाचीं ।
देहावसानें धरणी थरारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २०॥
अनुहातशब्द गगनीं न माय । त्याचेनि नादें भव शून्य होय ।
कथा निजांगें करुणा कुमारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २१॥
शांति स्वलीला वदनीं विलासे । ब्रह्मांडगोळीं असुनी न दीसे ।
भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २२॥
पीतांबरें मंडित नाभि ज्याची । शोभा जडीत वरि किंकिणीची ।
श्रीदेवदत्त दुरितांतकारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २३॥
जिवाशिवांची जडली समाधी । विटला प्रपंच तुटली उपाधी ।
शुद्धस्वरें गर्जति वेद चारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २४॥
निधानकुंभ भरला अभंग । पहा निजांगें शिव ज्योतिलिंग ।
गंभीर धीर सुरचक्रधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २५॥
मंदार बिल्वें बकुलें सुवासी । माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरीं भैरव विश्व तारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २६॥
जाई जुई चंपक पुष्पजाती । शोभे गळां मालतिमाळ हातीं ।
प्रतापसूर्य शरचापधारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २७॥
अलक्षमुद्रा श्रवणीं प्रकाशे ।संपूर्ण शोभा वदनीं विकासे ।
नेई सुपंथें भवपैलतीरीं । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २८॥
नागेशनामा सकळां जिव्हाळा । मना जपें रे शिवमंत्रमाळा ।
पंचाक्शरी ध्यान गुहाविहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ २९॥
एकांति ये रे गुरुराज स्वामी । चैतन्यरूपीं शिव सौख्यनामीं ।
शिणलों दयाळा बहुसाल भारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥ ३०॥
शास्त्राभ्यास नको श्रुती पढुं नको तीर्थांसि जाऊं नको ।योगाभ्यास नको व्रतें मख नको तीव्रें तपें तीं नको ॥
काळाचें भय मानसीं धरुं नको दुष्टासी शंकूं नको ।ज्याचीया स्मरणें पतीत तरती तो शंभु सोडूं नको ॥
वरील प्रकारे जर आपण शिवस्तुती केलीत तर कामातील अडथळे दूर होऊन आपणास ऐहिक वैभव, स्वास्थ्य व मानसिक शांती लाभेल यात तीळ मात्रही शंका नाही. चला तर मग आता पासूनच उपासनेला सुरवात करून आपले व आपल्या कुटुंबियांचे जीवन सुख संपूर्ण बनवूयात.
!! ॐ नमः शिवाय !!
Comments